logo

Sex Problems

लैंगिक समस्या



स्वप्नदोष

स्वप्नदोष (Nocturnal emission) म्हणजे 'झोपेत वीर्य बाहेर येणे'. स्वप्नदोषास स्वप्नावस्था, नाईट फॉल, ओले स्वप्न, रात्रीचे वीर्य गळणे (स्खलन), झोपेत वीर्यपतन होणे असेही म्हटले जाते. पुरुषांमध्ये झोपेत वीर्यस्खलन होणे किंवा स्त्रियांमध्ये झोपेत योनीसलील निर्माण होणे याला स्वप्नदोष असे म्हणतात. हा दोष नसून एक नैसर्गिक क्रिया आहे. ही क्रिया मुख्यतः किशोरावस्थेत आढळून येते पण कुठल्याही वयात होणे सामान्य आहे. या क्रियेच्या वेळी पुरुषांना कामुक स्वप्ने पडू शकतात आणि ताठरतेशिवायही ही क्रिया होऊ शकते. पुरुषांमध्ये या क्रियेने जुने शुक्रजंतू काढून टाकले जातात व नव्या शुक्रजंतूंच्या निर्मितीस चालना मिळते. किशोरवयामध्ये किंवा मुलं वयात येत असतानाच्या काळात कधी कधी झोपेत असताना लिंग ताठर होतं आणि वीर्य बाहेर येतं. जननेंद्रियांचं काम नीट चालू असल्याचं ते लक्षण आहे. मात्र अशा सामान्य घटनेला स्वप्नदोष असं नाव दिल्यामुळे त्यात काही तरी गैर आहे अशी भावना तयार होते. झोपेत वीर्य बाहेर येणे असा याचा साधा सरळ अर्थ आहे. स्वप्नावस्थेमध्ये मुलं/मुली किंवा स्त्री/पुरूष पाहत असलेलं स्वप्न लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारं असेल तर कदाचित लिंगाला ताठरता येवून परमोच्च क्षणी वीर्यपतनदेखील होवू शकतं. मुलींनाही झोपेमध्ये लैंगिक स्वप्न पडू शकतात. अशावेळी योनी ओलसर होते. मुलींच्या परमोच्च लैंगिक क्षणाच्यावेळी योनीमधून कोणताही स्त्राव येत नाही. त्यांना केवळ मानसिक अनुभव मिळतो.

हस्तमैथुन

स्वतःच्या जननेंद्रियांना (शिश्न अथवा योनी) विविध प्रकारे उत्तेजित करण्याच्या क्रियेला हस्तमैथुन म्हणतात. बहुतेक वेळा हस्तमैथुनाचा परिणाम लैंगिक उत्कटताबिंदू (इंग्रजी: Orgasm)गाठण्यात होतो. बहुतेक व्यक्ती स्वतःच्या हातांनी, किंवा इतर वस्तूंनी जननेंद्रियांचे घर्षण करून हस्तमैथुन करतात. सहसा 'हस्तमैथुन' शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्वतःला लैंगिक उत्तेजित करणे असा होतो. काही वेळा दोन व्यक्तींनी हस्तमैथुनासारख्या क्रिया एकमेकांच्या जननेंद्रियांवर करून, दुसऱ्यास लैंगिक उत्कटता मिळवून देण्याच्या क्रियेस सामायिक हस्तमैथुन असे म्हणतात. (इंग्रजी: Mutual masturbation) पौगंडावस्थेत येताच मुलांमध्ये व मुलींमध्ये हस्तमैथुन करण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होते. काहीवेळा लैंगिक स्वप्न पडून स्वप्नामध्ये वीर्यस्खलन होऊ शकतं. या सर्व गोष्टी अनेक मुलांमध्ये घडतात. त्यात अघटित असं काही नाही व त्यापासून काही अपायही होत नाही. लैंगिक उत्तेजना दाटली गेली की तिची वाट मोकळी व्हावी म्हणून निसर्गानेच या रचना ठेवल्या आहेत. हस्तमैथून म्हणूनच कुणाकडून शिकावं लागत नाही. अत्यंत स्वाभाविकपणे मुलं ते शोधून काढतात. असं करण्याने त्यांना कोणताही शारीरिक अथवा मानसिक अपाय होत नाही. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. काही मुलांमध्ये या व अशा गोष्टींबद्दल प्रचंड न्यूनगंड निर्माण होतो. मुलांमधील हा न्यूनगंड दूर करायचा असल्यास त्यांच्याशी मोकळी व उघड चर्चा करणं गरजेचं असतं.

नपुंसकत्व

पुरुषाच्या लिंगाला उद्दीपनावस्था येऊन ती वीर्यपतन होईपर्यंत टिकणे हे नैसर्गिक आहे. परंतु अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे, संभोग करण्यास असमर्थ ठरणे किंवा कामक्रीडा करताना लिंग उद्दीपन बिलकुल न होणे याला नपुंसकत्व म्हणतात. जगामध्ये नपुंसकत्व तक्रार असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. भारतात करोडो पुरुषांना ही समस्या आहे. नपुंसकत्वाच्या कारणांमध्ये मानसिक व शारीरिक अश्या दोन्हींचा समावेश होतो. मानसिक कारणे - पती-पत्नींमध्ये राग, द्वेष, संशयी स्वभाव, दोघांपैकी एकाचे विवाहबाह्य संबंध, इच्छेविरुद्ध विवाह, इच्छेविरुद्ध संभोग करणे, पुरुषाचे समलैंगिक आकर्षक तसेच चिंता ताण-तणाव अशा कारणांचा समावेश होतो. शारीरिक कारणे - मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अपघाताने कमरेवर जबरदस्त मार बसणे, लिंगाला आघात होणे, रक्तवाहिनी व रक्तातील काही गंभीर आजार, दारू, तंबाखू, सिगारेट यांचे व्यसन, अति चमचमीत आहार सतत करणे, व्यायामाच्या अभावाने आलेला लठ्ठपणा, रक्तातील संप्रेरकांचे संतुलन बिघडणे या सर्वांचा समावेश होतो. काहीवेळा स्त्रीला आलेल्या योनीआकर्ष या समस्येमुळे योनीप्रवेश न घडल्याने पुरुषांमध्ये नपुंसकत्व येते. त्यामुळे यावर उपचार करताना लैंगिक समस्या तज्ज्ञच योग्य उपचार करू शकतो.

शीघ्रपतन

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.


शीघ्रपतन का होतं? तरूणपणी जेव्हा लैंगिक संबंधांचा अनुभव नसतो तेव्हा आपल्याला ‘सगळं’ जमेल ना या चिंतेमुळे शीघ्रपतन होऊ शकतं. काही काळाने यावर ताबा येतो. यासोबत इतरही कारणांमुळे ही समस्या निर्माण होते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.